शासकीय योजनेतील पेन्शन लाभार्थ्यांना महिन्याच्या महिन्याला मिळावी!
कोल्हापूर जिल्हा: संजय गांधी पेन्शन लाभार्थी
कोल्हापूर जिल्हा: श्रावण बाळ योजना लाभार्थी
कोल्हापूर जिल्हयामध्ये साधारण संजय गांधी पेन्शनचे ६९ हजार ८८३ व श्रावण बाळ योजनेतील १ लाख २४ हजार ४७३ हे शासनाच्या योजनेतील लाभार्थी आहेत. करवीर तालुक्यात ही मोठया प्रमाणात लाभार्थी आहेत. साधारण २ ते ३ महिने सदर योजनेतील जेष्ठ वयोवृध्द लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नसल्याने सदर वयोवृध्दांना औषधांच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैश्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे लाभार्थी बँकेमध्ये हेलपाटे मारत आहेत. सध्या कडक उन्हाळा असल्याने शासन सांगते दुपारी २ ते ३ बाहेर पडू नका आणि ही वयोवृध्द पेन्शन धारक बँकेमध्ये हेलपाटे मारत आहेत. तरी शासनाने प्रत्येक महिन्याच्या महिन्याला शासनाच निकषामध्ये बसवून जी पुर्वी पेन्शन लागू झाली आहे. त्या वयोवृध्दांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
हयातीच्या दाखल्याचा मनस्ताप थांबवा:
सध्या शासनाच्या हयातीच्या दाखल्यासाठी वयोवृध्द महा ई सेवा केंद्रामध्ये आपल्या हयातीच्या दाखल्या संदर्भात गर्दी करत आहे. त्यासाठी त्यांना ५० ते १०० रूपये खर्च असून शासनाने तलाठी मार्फत त्यांच्याकडे असणाऱ्या यादी वरून घरा-घरात जावून वयोवृध्द हयात आहे काय तसा अहवाल तहसिलदार कार्यालयात पाठविण्यासाठी आपण आदेश करावेत. जेणे करून वयोवृध्दांचे हेलपाटे व पैसे वाचतील आपण तसे आदेश गावकामगार तलाठयांना करावेत.
यापुर्वी शासनाच्या डि.बी.टी. थेट बँक खात्यात हे नियम साधारण डिसेंबर २०२४ मध्ये शासनाने पारित केला संजय गांधी श्रावणबाळ अपंग विधवा महिला हे जास्तीत जास्त लाभार्थी पुरुष किंवा महिला इतकी वयोवृध्द आहेत त्यांना त्या कालावधीमध्ये ७ ते ८ महिने बँक खाते लिंक करण्यात गेल्याने त्यांची पुर्वी ७ ते ८ महिन्याची पेन्शन शासनाकडे असून ती ही आपण त्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठ पुरावा करावा. जेणे करून ज्या उद्देशाने शासनाने ही योजना चालु केली त्या लोकांना त्यांच्या हक्काच्या पेन्शन पासून वंचित ठेवता कामा नये. तरी वरील हयातीच्या दाखल्या संदर्भात आपण तसे गावकामगार तलाठयांना आदेश करावेत. जेष्ठांना पेन्शन नाही व हयातीच्या दाखल्यासाठी खर्च ही अवस्था आपण थांबवावी व चालु २ ते ३ महिन्याची थकीत पेन्शन त्वरित अदा करावी व पुर्वी शासनाकडे ७ ते ८ महिन्याची पेन्शन राहिली आहे त्याचा आपण पाठ पुरावा करून लाभार्थ्यांना मिळवून दयावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
पदाधिकाऱ्यांचे कडक प्रहार:
रविकिरण इंगवले (जिल्हाप्रमुख)
"शासनाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी तसे जाहीर करावे परंतु गोरगरिबांचे औषध पाण्यासाठी लागणारे शासकीय योजनेतील पैसे तटवू नयेत..."
राजू यादव (करवीर तालुका प्रमुख)
"प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळालीच पाहिजे व हयातीचे दाखल्यांसाठी वयोवृद्धांना कडक उन्हात कशासाठी फिरवत आहात तलाठ्यांनी सर्वे करावा व त्यालाच हयातीचा दाखला समजण्यात यावा यादी तयार करावी..."
तहसीलदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्तर:
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही स्तरावर माझ्या येथे निर्णय होईल व मागची जी आठ महिन्यांची थकित यादी आहे ती पण शासनाकडे पाठवलेले आहे असे संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी बोलून त्यांना सांगितलेले आहे असे तहसीलदार स्वप्निल पवार यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक:
जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, सुनील पारपाणी, दिपक अंकल, कैलास जाधव, बाबुराव पाटील, रामराव पाटील, गणेश चावरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
