ऐन पेरणीत शेतीपंपांची वीज कपात; १ जूनपासून आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यात सुरू असलेल्या खरीपपूर्व मशागतीच्या आणि ऐन पेरणीच्या काळात महावितरणकडून शेतीपंपांच्या वीजपुरवठ्यात अचानक करण्यात आलेल्या कपातीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतीपंपांची तब्बल दोन तास वीज कमी करण्यात आल्याने आधीच दुष्काळी परिस्थिती, वाढलेला उत्पादन खर्च आणि पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कपात केलेली वीज तात्काळ पूर्ववत करून शेतकऱ्यांना किमान दहा तास वीज द्यावी, अन्यथा १ जूनपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जय शिवराय किसान संघटनेने महावितरण प्रशासनाला दिला आहे.
महावितरण कार्यालयात निवेदन सादर
जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २६ मेपासून जिल्ह्यातील शेतीपंपांची वीज दोन तासांनी कमी करण्यात आली आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असून पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीत महावितरणने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता थेट वीज कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक ठिकाणी पिके करपू लागली असून शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली गेला आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर गदा आणण्यापेक्षा उद्योगधंद्यांची वीज कमी करा,” अशी संतप्त मागणी संघटनेने केली आहे. शेतकरी वर्षभर राबून संपूर्ण समाजाचे पोट भरतो, त्यामुळे प्रशासनाने शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता आठ तासांऐवजी दहा तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत कपात तात्काळ मागे न घेतल्यास १ जूनपासून महावितरण कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजी माने यांनी दिला. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी महावितरण आणि प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
